
२१.१
अध्यात्मविचारांनी तो नेहेमी झिंगलेला दिसायचा. होय ! झिंगलेला हाच शब्द बरोबर आहे आणि जाणीवपूर्वक वापरलाय तो ! कारण झिंगलेला आणि रंगलेला या स्थितींमधला फरक लक्षात येतो ना सुज्ञांना लगेच !!
२१.२
आचार्य आपल्या लाडक्या शिष्यांना सांगत होते, “ही गोष्ट खरी आहे की देव जसा प्रल्हादाला जवळ घेतो तसा हिरण्यकश्यपूलाही मांडीवर घेतो. आणि हेही खरं की हल्लीच्या परिस्थितीत प्रल्हादापेक्षा हिरण्यकश्यपू होणं अधिक सोपं आह. पण आपल्या गुरुकुलात यादोघांतील फरकच मी तुम्हाला शिकवणार आहे पुढची बारा वर्ष.
२१.३
टीचर वर्गात आली आणि तिने स्टुडंट्स ना अनाऊन्स केलं की क्लास टेस्ट मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन ऑप्शनला आहे म्हणून स्टुडंट्सनी त्याचा स्टडी करायची गरज नाही
हे ऐकून सगळ्या स्टुडंट्सनी बेंचेस बँग केले आणि प्रचंड केऑस केला.
सूचना : या गोष्टीतील माथितार्थ नीट कळण्यासाठी मराठी वाहिन्यांवर हल्ली ऐकू येणारं शुद्ध मराठीच वापरलेलं आहे याची कृपया नोंद घ्यावी.
२१.४
एक तांदुळाचा दाणा एका पाण्याच्या थेंबाला म्हणाला तुझं आणि माझं नशीब सारखंच आहे नाही ? ज्यांच्याकडे आपण असतो त्यांना आपली किंमत नसते आणि ज्यांच्याकडे नसतो ते आपल्यासाठी कितीही किंमत द्यायला तयार असतात..
२१.५
त्याने चित्र काढण्यासाठी कॅनव्हास तयार केला. रंग मांडले , ब्रशची निवड केली. पण काय झालं कोण जाणे, दोन तास तो त्या शुभ्र कॅनव्हासकडे एकटक पाहत राहिला. शेवटी खाली उजव्या कोपऱ्यात नुसतीच छोटी सही केली आणि चित्राला नाव दिलं ‘निष्कलंक शून्य’