
१५.१
एकदा एका बिल्डिंगच्या मैल्याची टाकी तुंबली म्हणून सफाई कामगाराला बोलावलं. तो काम झाल्यावर स्वच्छ होऊन आला आणि त्याने पाणी मागितलं तर त्याला दुरूनच तुटक्या कपातून पाणी मिळालं आणि त्याला सांगण्यात आलं,”जाता जाता तो कप कचऱ्यातच फेकून दे रे”
१५.२
एक मजूर दुपारच्या उन्हात रस्त्याच्या कडेला खडी फोडत होता आणि शेजारीच पहुडलं होतं त्याचं तान्हं मूल, त्या मजुराने त्याच्या शरीराने केलेल्या आडोशाच्या सावलीत, दगड फुटताना झालेल्या हतोड्याच्या लयीतील त्याच्या फुललेल्या श्वासांचं अंगाई गीत ऐकत….
१५.३
तेहतीसाव्या मजल्यावर एका लाकडाच्या लपकत्या फळीवर उभं राहून कमरेभोवती गुंडाळलेल्या एका रस्सीच्या भरवश्यावर तो रंगारी इमारतीची भिंत रंगवत होता. मनात आलं, त्या रस्सीइतका विश्वास जरी ईश्वरावर ठेवला तरी मुक्ती फार कठीण नाही ..
१५.४
स्वतःच्या हाताने घासून पुसून चकचकीत केलेल्या स्टीलच्या ताटलीत ती आपला चेहरा निरखत होती. तिच्या व्हॅनिटी व्हॅन मधल्या आरश्यापेक्षाही लहानपणापासून लोकांची भांडी घासताना तिचा खरा चेहरा दाखवणाऱ्या स्टीलच्या ताटलीवरच तिचा अजूनही अधिक विश्वास होता.
१५.५
तो कधीच कुणाचं ऐकायचा नाही. त्याला हवं तेच तो करायचा . त्याच्यापुढे सारेच हतबल असायचे. पण आज त्याला अनेक अनाथ मुलांच्या त्यांच्या अनाथालयातील मावशीला न नेण्यासाठी केलेल्या प्रार्थना ऐकू आल्या आणि यमाने त्या ऐकल्याही.