
१४.१
एका मजुराच्या मुलाला रद्दीत एक जुनं मराठी म्हणी, सुभाषितांच पुस्तक मिळालं. तो ते पुस्तक घेऊन आपल्या मालकाच्या मुलाकडे गेला आणि म्हणाला “माझा बा, मला साळत न्हाई पाठवू शकत. मला ह्यो वाचून दाखिव की रे!” त्यावर मालकाचा मुलगा त्याला म्हणाला, “अरे हे मराठीत आहे , मला नाही रीड करता येत.तू डॅडबरोबर चेक कर ते लहानपणी मराठी शाळेत शिकलेत असलं काहीतरी! “
१४.२
तो एक मराठी साहित्यिक होता. त्याला एका ‘साहित्य अकॅडमी’ तर्फे मराठी साहित्याबद्दल ‘अवॉर्ड’ मिळणार म्हणून त्याची सर्व माहिती एका ‘फॉर्म’मध्ये व्यवस्थित ‘कॅपिटल लेटर्स’ मध्ये भरून घेतली त्यांनी त्याच्याकडून कारण ‘अवॉर्ड’ च्या ‘चेक’ वर नाव लिहिताना ‘स्पेलिंग मिस्टेक’ नको व्हायला नं !!
१४.३
शाळेच्या पहिल्या दिवशी त्याने त्याच्या मुलाच्या वहीच्या पहिल्या पानावर सुंदर आणि सुबक असं सरस्वतीचं चिन्ह काढलं. ते पाहून मुलगा खुश झाला आणि दुसऱ्याच दिवशी त्या चिन्हाचा टॅटू त्याच्या दंडावर गोंदवून त्याच्या स्कुलचा ‘कुल डुड’ बनला .
१४.४
‘दुर्दर्शन’ वरच्या एका मराठी वाहिनीवर एका मालिकेला अजिबात ‘टीआरपी’ मिळेना म्हणून ती बंद झाली. जेव्हा चौकशी झाली त्यावेळी असं कळलं की ती मालिका खरंच मराठीत लिहिली असल्यामुळे कुणाला कळलीच नाही.
१४.५
एका शाळेच्या अभ्यासक्रमात फ्रेंच, जर्मन या ‘कम्पलसरी सेकंड लँग्वेज’ च्या मागोमाग ‘मराठी’ ला ‘ऑप्शनल थर्ड लँग्वेज’ चा दर्जा मिळाल्याचं पाहून ‘मी मराठी’ म्हणून माझा किती उर भरून आला माहित्ये!!!