
सैनिकहो तुमच्यासाठी
१३.१
‘सरहद जवान मदत निधी’ साठी जेव्हा कार्यकर्ते त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने त्यांना विन्मुख परत पाठवलं कारण त्याचं सगळं बजेट नुकतंच त्यांच्या घराची सेक्युरिटी सिस्टिम बसवण्यात खर्च झालं होतं म्हणे!!
१३.२
एका नेत्याने प्रस्ताव आणला की सैन्यात धर्माप्रमाणे तुकड्या पाडाव्या. सगळ्या सैनिकांनी ते मान्य केलं पण एकच अट ठेवली की प्रत्येकाच्या धर्मानुसार त्या त्या रंगाचं रक्त त्यांच्या शरीरातून जेव्हा वाहू लागेल तेव्हाच हा नियम लष्करात लागू करावा.
१३.३
तो जवान पेन्शन घेण्यासाठी सरकारी कार्यालयात गेला खरा पण त्याला तिथल्या कारकूनबाबूने हाताचे ठसे जुळत नाहीत म्हणून परत पाठवलं. तो जवान त्याला सांगून थकला की ठसे जुळणारे हात त्याने मागच्या युद्धात गमावले होते .
१३.४
एका व्ही व्ही आय पी च्या मुलीच्या सहलीला सुरक्षा व्यावस्था द्यायची म्हणून त्या जवानाची तीन वर्षांनंतर मंजूर झालेली रजा रद्द केली गेली हे जेव्हा त्याला कळलं त्यावेळी त्याला ठरवता येईना की त्याचे बर्फात गाडून उभे असलेले पाय अधिक बधिर झालेत की त्याचं पायदळी तुडवलेलं मन !!
१३.५
त्याच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता . कुणीतरी आलं आणि त्याचा नेहेमीचा सैनिकी मग्गा घेतला आणि त्यात तो पिंड ठवला मग क्षणार्धात शिवला कावळा. तेव्हा लोकांना आठवलं की “एकवार सैनिक , नेहेमीच सैनिक (Once a soldier is always a soldier)” असं तो नेहेमी का म्हणायचा!!