
प्रसंग एक:
आद्य शंकराचार्य म्हणजे ज्ञानभांडार, विद्वत्तेचा सागर, बुद्धीचा भास्कर. ते एकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी आपला दंड वाळूत खुपसला आणि वर काढला. त्याला काही वाळूचे कण चिकटले होते. त्याच्याकडे निर्देश करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले की, “या समुद्रकिनाऱ्यावर जितकी वाळू दिसते आहे त्यापेक्षा अनंत पटीने विश्वात ज्ञान पसरलं आहे. आणि त्यापुढे माझ्याकडे या दंडाला चिकटलेल्या वाळूच्या कणांइतकंही ज्ञान नाही.”
प्रसंग २:
एका संगीत समारोहात तबलानवाज उस्ताद अल्लारखा खांसाहेबांना कुणीतरी चार शब्द बोलायला सांगितले. ते म्हणाले, ” मै बोलना नही जानता, बस थोडासा तबला जानता हू. और जितना तबलेका ग्यान इस दुनियामे है उसमेसे मुझे बस रत्तीभर तबला समझ मे आया है. मै क्या बोलू?”
यातला पहिला प्रसंग मी वाचलेला आणि दुसरा प्रत्यक्ष अनुभवलेला. उस्ताद अल्लारखा खांसाहेबांचा प्रसंग जेव्हा घडला त्यावेळी मी १४-१५ वर्षाचा होतो. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला वाटलं “ज्या व्यक्तीच्या तबल्याचा नाद सगळ्या जगभर प्रतिध्वनीत होत राहतो त्या उस्ताद अल्लारखा यांना इतकाच तबला येतो? शक्यच नाही. मला वाटतं ते विनयाने असं बोलत असावे. मोठ्या लोकांना असं विनयाने बोलून लोकांवर छाप पडायला आवडतं बहुतेक.”
मध्ये बरीच वर्ष गेली.
मी जेव्हा संवादिनी शिकायला सुरुवात केली तेव्हा मी नुकतीच इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतली होती. त्या आधी तबला वाजवत असे पण एक स्वरवाद्य वाजवता आलं पाहिजे ही मनात इच्छा झाल्यामुळे संवादिनीकडे वळलो. जेव्हा संवादिनी शिकायला सुरुवात केली त्यावेळी माझे गुरुजीं संवादिनीजनक पं. मनोहर चिमोटे यांनी मला पलट्यांचा रियाझ करायला सांगितला. एकदा रियाझ करता करता अचानक माझ्यातला इंजिनिअर जागा झाला आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन एकदा सगळे पलटे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार शोधून काढावे म्हणून कॉम्पुटर काढून एक्सेल शीट उघडली. बरेच क्लिष्ट अल्गोरिथम वापरून एक फॉर्मुला तयार केला आणि पहिल्या रकान्यात “सा” दुसऱ्यात “रे” तिसऱ्यात “गं” असे सात रकान्यात सात स्वर लिहिले आणि पुढच्या रकान्यात फॉर्मुला वापरून “सारे, रेग, गम” हा पालटा तयार झाला पुढच्या रकान्यात “सारेग, रेगम, गमप” वगैरे पलटे तयार झाले. आधी वाटलं बस या तऱ्हेने सगळे पलटे कॉम्पुटर ऍटोमॅटिक मला तयार करून देईल. दोन स्वरांचे पलटे तरी ठीक आहे पण जसे तीन स्वरांचे पलटे बनवण्याचे फॉर्मुले शोधायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की मीच काय पण कॉम्पुटर सुद्धा हँग होईल तीन स्वरात. आणि ही गत तीन स्वरांतच, आणि तीही फक्त सरळ पलटे शोधून काढण्यात झाली तर लगावं, घसीट, गिराव, कण, अवकण, खटका, मुरकी, मींड, गमक या सगळ्याचे सातही स्वरांचे सगळे पलटे शोधून काढणं अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यात दहा थाट, आणि अनंत रागचलन आणि अजून खूप काही… अरे बापरे !!
तो दिवस आणि ती वेळ म्हणजे माझी अनंताशी झालेली पहिली खरी तोंडओळख. इंजिनिअरिंग मध्ये गणिताच्या सूत्रांमध्ये विशेषतः कॅल्क्युलस, इंटिग्रेशन वगैरे शिकलो त्यावेळी आम्ही कितीतरी वेळा इन्फिनिटी म्हणजे अनंताचा वापर केला होता. पण त्या अनंताचा आवाका त्यावेळी केवळ एका चिन्हापुरता मर्यादित होता. पण अनंत म्हणजे काय आणि मानवी बुद्धी तिथपर्यंत कशी पोहोचू शकत नाही याचा पहिला प्रत्यक्ष अनुभव त्या दिवशी मला मिळाला. बरं संगीत आणि त्याच्या अनंत उपशाखा हा एक विषय झाला. असे जगात अनंत विषय आहेत आणि ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत की त्या प्रयेक शाखेत, अनंत उपशाखा आणि त्यात प्रत्येकात अनंत ज्ञान भरलेलं आहे. मी नुसत्या विचाराने दिग्मूढ झालो. संपूर्ण शरणागत झालो. माझ्या याच जन्मातच काय पण अनंत जन्मातही नुसत्या एका संगीत या विषयाचा विचार पूर्ण होणार नाही हे मनापासून जाणवलं, पटलं. अनंताचं हे गणित कधीही अपूर्णच असणार याची पुसटशी कल्पना आली. मनात खूप क्षुद्र वाटलं स्वतःबद्दल. अहं चूर चूर झाला. रियाझ स्वरांवर हुकूमत गाजवण्यासाठी करायचा नसतो. रियाझ ही आपल्यावर स्वराने कृपा करावी म्हणून अखंड चाललेली प्रार्थना असते हे त्यादिवशी कळलं. त्या क्षणापासून स्वर स्वामी झाला आणि मी दास. आणि गंमत म्हणजे अहंकार चिरडला गेल्यानंतरही मनाला अवर्णनीय आनंद होऊ शकतो हा विचित्र वाटणारा पण तितकाच अद्भुत अनुभवही त्या दिवशी पहिल्यांदाच घेतला मी.
याचा अर्थ आद्य शंकराचार्य काय किंवा उस्ताद अल्लारखा काय, नुसतं दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी विनयशील बोलत नव्हते तर… त्यांनीही सोडवून पाहिलं असणार कधीतरी हे अनंताचं गणित…